मुंबई : प्रतिनिधी
माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनो राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण होईल, हा मुद्दा डोक्यातून काढून टाका. जर सगळ्याच महामंडळाने विलीनीकरणाचा हट्ट धरला तर कोणत्याच सरकारला तो पूर्ण करणे शक्य होणार नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या जवळपास बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांना इतर राज्याप्रमाणे समकक्ष वेतन आणले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू आहेत. परंतु बस सेवा चालू नसल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे सगळ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातल्या आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची समज काढून पुन्हा कामावर येण्याची विनंती करावी, असे आवाहन अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना म्हटले आहे.
विलीनीकरणाचा विषय न्यायालयाचा आहे. न्यायालय त्यात अंतिम आदेश देईलच. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हायला हवे. सगळे एसटी कर्मचारी आपलेच आहेत. संप ताणला गेला तर गिरणी कामगारांसारखी एसटी कर्मचाऱ्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा मुद्दा डोक्यातून काढून टाकावा. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.