
पंढरपूर : प्रतिनिधीराज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी संप केला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्तिकी एकादशी निमित्त अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी मागणी संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली आहे. मात्र अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही; तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील बस सेवा बंद आहे.
अजित पवार यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी अयोग्य असल्याचे सांगितले. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रश्न न्यायालयामध्ये आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.