
पुणे : प्रतिनिधी
कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्यासह केंद्राची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने खबरदारी घेण्याबाबत सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. असे असले तरी एकीकडे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील नव्या केंद्रीय मंत्र्यांद्वारे जनआशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवायची अशी दुटप्पी भूमिका केंद्र सरकार घेत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. जनआशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा फटका बसला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी ज्या जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा दर अधिक आहे, त्यांना तातडीने पावले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सणासुदीच्या काळात गर्दी होणार नाही, ही गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करावी, असेही निर्देश दिले आहेत.
गृह सचिवांच्या कोरोनासंदर्भातील पत्रावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राच्या दुटप्पी वर्तनावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, राज्यांना खबरदारीचा सल्ला देता, आणि दुसरीकडे नवीन केंद्रीय मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात. आगामी काही दिवसांतच या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसलेला दिसेल. उद्या याठिकाणी रुग्ण वाढले तर याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.