आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ऊसतोडणी कामगारांच्या विकासासाठी समन्वायाने काम करा : अजितदादांच्या सर्व विभागांना सुचना

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

  • ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी राज्यात उभारण्यात येणार वसतिगृहे
  • ऊस तोडणी कामगार, मुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे
  • कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. त्याचप्रमाणे राज्यातील स्थलांतरीत ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणी प्रमाणे ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी तसेच कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सुमारे १०१ सहकारी आणि ८७ खासगी साखर कारखा्रन्यांमध्ये मिळून अंदाजे आठ ते दहा लाख ऊस तोडणी कामगार राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्थलांतरीत होऊन काम करतात. या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळणे आवश्यक आहे. स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागांनीया समन्वयाने काम करावे.

स्थलांतरीत ऊस तोडणी मजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असून राज्यातील ज्या भागांतून अधिक ऊस तोडणी मजूर स्थलांतरीत करतात, त्या ठिकाणी वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी. ही वसतिगृहे दर्जेदार पध्दतीने उभारण्यात यावीत, सध्या मंजूर झालेल्या वस्तीगृहा व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार राहतात त्या ठिकाणीही वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  यामध्ये सर्व सोयीसुविधां पुरविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

तसेच राज्यातील ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुक कामगारांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

धनंजय मुंडे यांनी यावेळी कै. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळातर्फे करण्यात येणाऱ्या योजना व इतर बाबींची माहिती दिली.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us