Site icon Aapli Baramati News

उसाच्या एफआरपीवरून सदाभाऊ खोत आक्रमक; राज्य सरकार विरोधात करणार आंदोलन

ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

उसाच्या एफआरपीवरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. एफआरपी अदा करण्याच्या पद्धतीत बदल केल्याच्या निषेधार्थ येत्या २६  फेब्रुवारीपासून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

एफआरपीबाबत राज्य सरकारने नवीन आदेश काढला आहे. त्यावरून राज्य सरकारवर सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. राज्य सरकारने  एफआरपीच्या नियमात बदल  करत शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असुन  हे सरकार शेतकरीद्रोही आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

नविन नियमानुसार एफआरपी आता दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसाठी १०% रिकव्हरीचा, दुसरा टप्पा मराठवाडा-विदर्भासाठी ९.५%  टक्के रिकव्हरीसाठी असणार आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांनी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. कारखान्यांचे खर्च केलेले पैसे जाऊन राहिलेले शिल्लक राहिलेले पैसे शेतकऱ्यांना देणार आहेत.  ‘कारखानदार तुपाशी आणि शेतकरी उपाशी’ अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना  मातीत घालणारे हे सरकार असून या सरकारच्या विरोधात येत्या २६ फेब्रुवारीला शिर्डी येथून रयत क्रांती संघटना आणि भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे. येणाऱ्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन या  सरकारच्या विरोधामध्ये उभे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version