पुणे : प्रतिनिधी
दररोज कोरोना रुग्ण संख्येत भर पडत आहे. हजारोंच्या संख्येत रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात तिसर्या लाटेचा शिरकाव झाला आहे. तज्ञांच्या मतानुसार या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. मात्र पालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकांना चांगलेच फटकारले आहे.
नियमावली लागू असताना पालक नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत. लहान मुलांना मॉल, हॉटेल सारख्या गर्दीच्या ठिकाणी घेऊन जातात. १५ वर्ष आणि ज्येष्ठांपर्यंत जवळपास सगळ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त आहे.
पत्रकार परिषदेत अजित पवार यांना पत्रकारांनी लहान मुलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर होईल का, असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, सध्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी जी नियमावली निश्चित केली आहे, ती लागू आहे. लहान मुलांना त्रास होऊ नये, म्हणून शाळा बंद ठेवल्या आहेत.
पालक गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नेतात. पालकच नियमांचे उल्लंघन करत आहेत. पालकांनी ऐकले नाही तर या आठवड्यात परिस्थिती लक्षात घेऊन कठोर निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी पालकांना दिला.