मुंबई : प्रतिनिधी
काल महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी काही काळ स्वतंत्रपणे चर्चाही केली. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत येवून सत्ता स्थापन करावी आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे.
काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी स्वतंत्रपणेही चर्चा केली. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी घेतली शरद पवार यांची भेट
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत विविध समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा केल्याचे आठवले यांनी सांगितले. ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याबाबत तसेच पदोन्नती आरक्षणावर राज्य सरकारच्या माध्यमातून अनुकूल निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.