
बीड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असताना अनेक शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अशातच उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी तिरुपतीच्या बालाजीला प्रार्थना करण्यासाठी निघालेले बीडचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांचे वाटेतच निधन झाले आहे.
प्रकृती अस्थिर असल्याचे कळताच सुमंत रुईकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. सुमंत रुईकर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यासाठी त्यांनी तिरुपतीला पायी जाऊन प्रार्थना करण्याचा निर्धार केला. मोठ्या हिमतीने ४७ वर्षीय सुमंत रुईकर बीडपासून ते तिरुपती बालाजीला पायी चालत निघाले.
सुमंत रुईकर पायी चालत तेलंगणा राज्यात पोहचले होते. मात्र तिरुपतीला जास्त असताना वाटेत त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिक लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बीडसह राज्यातील शिवसैनिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.