
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मंगळवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशी कोणत्या प्रकरणामध्ये करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आगोदरच वायकर यांची ईडीकडून चौकशी झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांना चौकशीचा अधिकार आहे. त्यानुसार मला चौकशीसाठी बोलावले. आरोप वगैरे काही झालेले नाहीत. यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांच्या प्रश्नांवर मी उत्तरे दिली आहेत. त्यांनी बोलवल्यानंतर जाणे आणि स्पष्टीकरण देणे हे या देशाचे नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. कोणत्या प्रकरणात चौकशी केली असे विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती उघड करता येणार असल्याचे स्पष्ट केले.
रवींद्र वायकर यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असल्यामुळे चौकशी करण्यात आली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता रवींद्र वायकर म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्या जवळचा असल्यामुळे मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे,असे मला वाटत नाही. माझी चौकशी ही एकाच अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांना ज्या शंका होत्या त्यांनी त्या विचारल्या आहेत. मी त्यांच्या शंकेचे निरसन केलं. त्यांनी बोलावले त्यामुळेच मी गेलो होतो असेही रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले आहे.