आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

इंदापूरमधील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा होणार पूर्ववत; हर्षवर्धन पाटील यांच्या ३१ तासांच्या धरणे आंदोलनाला यश

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला ३१ तासांनी यश मिळाले. इंदापूर तालुक्यातील शेतीचा वीजबिल थकबाकी वसुलीसाठी गेली ११ दिवस बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय  महावितरणने घेतला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

थकीत वीजबिलासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या ११ दिवसांपासून पुर्णपणे खंडित केला होता. परिणामी शेती पिकांचे मोठे नुकसान होत होते. तसेच जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु करावा, या मागणीसाठी भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या महावितरण कार्यालयासमोर शनिवारी  सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या बेमुदत आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शेतकरी सहभागी झाले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्याने प्रत्येक हॉर्सपॉवरला ५०० रुपयांप्रमाणे वीज बिलाची रक्कम भरावी. प्रत्येक डीपीला रक्कम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्केऐवजी ६० ते ७० टक्के एवढी असली तरी डीपी चालू करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम जास्त आलेली असल्याने लवकरच तालुक्यात वीज बिल दुरुस्तीचे मेळावे घेतले जातील, सदर मेळाव्याची तारीख शेतकऱ्यांना कळविण्यात येईल.

कृषी संजीवनी योजनेतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीच्या अटी काढून टाकण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, महावितरणचे कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांच्यासोबत मुंबईत लवकरच बैठक होवून त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विजबिल ३ महिन्याऐवजी ६ महिन्याला देण्याबाबतही या बैठकीत मुद्दा मांडला जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसंदर्भात वारस नोंदीही मार्गी लावण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

महावितरण कडून प्रत्येक पाच वर्षांनी प्रति हॉर्स पावरच्या बिलात वाढ केली जाते, त्यामुळे जास्त बिल वाढवले तर थकबाकीचे प्रमाणही वाढते. यासंदर्भात निर्णय घेताना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. इंदापूर तालुक्यात गावागावांमध्ये तारांना झोळ असल्याने स्पार्किंग होऊन आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे  तारांना आलेले झोळ काढणे, नवीन पोल टाकणे आदि कामांचे नियोजन करण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.            

तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी सुमारे दोन ते अडीच तास चर्चा झाली. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष  पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व भाजपचे पदाधिकारी तसेच  उपअभियंता रघुनाथ गोफणे, मोहन सुळ उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us