लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय व विविध विकासकामांचे भूमिपूजन
पुणे : प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दीर्घकाळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार दिगंबर भेगडे आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याला शासन सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकटाचा अनुभव लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत लोणावळा शहरात 100 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभे करण्यात येत आहे. लोणावळा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक निधी देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयासोबतच अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 41 कोटी रुपये खर्च करून लोणावळा शहरात उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या रुग्णालयात सर्व सोईसुविधा असणार आहेत. लोणावळा शहरासह मावळ परिसरातील विकासकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोणावळा परिसराच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यटन विकासाला गती देण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहेत. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. त्यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी व रोजगार वाढीसोबतच या परिसरात आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असेही हे म्हणाले. कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, लोणावळा हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयामुळे स्थानिक नागरिक तसेच येणाऱ्या पर्यटकांनाही आरोग्य सुविधा मिळतील. राज्यातील सर्वसामान्य नागरिक समोर ठेवून शासन विविध विकासयोजना राबवत आहे, या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
लोणावळा शहरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार उपजिल्हा रुग्णालय उभे रहात असल्याचे आमदार शेळके म्हणाले.
कार्यक्रमाला आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मावळ परिसरातील विविध विकासकामाचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते कार्ला फाटा येथील एकविरा देवी पायथा ते कार्ला भाजे लोहगड ते प्रजिमा 26 ला मिळणारा रस्ता रुंदीकरण व कार्ला भाजे लोहगड ते प्रजिमा 26 रस्त्यावर इंद्रायणी नदीवर मोठा पूल, कामशेत येथील कामशेत नाणे गोवित्री रस्ता प्रजिमा 78 किमी 9/00 मध्ये कुंडलिका नदीवर पुलाची पुनर्बांधणी तसेच कामशेत –नाणे- गोवित्री –सोमवडी-थोरण-जांभवली रस्ता सुधारणा राज्य मार्ग 126 किमी रस्ता सुधारणा, कान्हे येथील (वडगाव) ग्रामीण रुग्णालय 70 खाटांचे श्रेणी वर्धन व ट्रामा केअर सेंटरचेही भूमिपूजन करण्यात आले.
वडगाव येथेही विकासकामांचे भूमिपूजन
वडगाव नगरपंचायत नवीन प्रशासकीय इमारत, वडगाव नगरपंचायत अंतर्गत मुख्य रस्ता सुधारणा, वडगाव मावळ येथे पोलीस स्टेशन इमारत, वडगाव मावळ शहरातील अंतर्गत रस्ते सुधारणावडगाव नगरपंचायत इमारत आदी विकासकामाचेही भूमिपूजन श्री.पवार यांच्या हस्ते झाले.