
देगलूर : प्रतिनिधी
आमच्या नादाला लागू नये अन्यथा ‘आदर्श’ची फाईल बाहेर निघेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिला आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाणांनी वंचितांच्या गाड्यांमध्ये भाजपाचे पेट्रोल असते, असा आरोप केला आहे. मी आजच्या सभेला हेलिकॉप्टरने आलो आहे. त्याचे भाडेही कार्यकर्त्यांनी दिले आहे. नाहीतर अशोक चव्हाण म्हणतील आजचे हेलिकॉप्टर सुद्धा भाजपवाल्यांनीच दिले आहे असे नमूद करुन प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमच्या नादी लागू नये अन्यथा आम्ही उच्च न्यायालयावर मोर्चा काढूनआदर्श घोटाळ्याची बंद असलेली फाईल पुन्हाबाहेर काढू. तुमची बरीच प्रकरणे आहेत. मात्र मी जास्त खोलात जात नाही. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अशोक चव्हाण यांनी जे ‘आदर्श’ प्रकरण केले आहे. त्याची फाईल पुन्हा ओपन होण्यास जास्त वेळ लागणार नाही. जर फाईल ओपन झाली तर तुम्हाला तुमच्या बायको-मुले आणि सासूसह जेलमध्ये जावे लागेल. तुम्ही एकटेच नाही तर तुमच्या सोबत सुशीलकुमार शिंदे यांनासुद्धा जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे नादाला लागू नका, असे आंबेडकर यांनी यावेळी म्हटले आहे.