
पुणे : प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट सौम्य झाल्याने वसतिगृह सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून विद्यापीठातील टप्प्याटप्याने वसतिगृहे सुरू होणार आहे, अशी माहिती वसतिगृह प्रमुख डॉ. सचिन बल्लाळ यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात पी.एच.डी. आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी चार वसतिगृहांची तयारी पूर्ण झालेली आहेत. या वसतिगृहात निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि वीजेची सोय इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. इतर वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
वसतिगृह बंद असल्याने या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना वसतिगृह सुरू करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश मिळाले असून वसतिगृह सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.