हवेली : प्रतिनिधी
दोन लाख रुपये गाडीच्या डिकीत ठेवून सलूनमध्ये दाढी करायला जाणे; एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी गाडीच्या डिकीत ठेवलेली ती दोन लाखांची रक्कम लंपास केली आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास उरळीकांचनमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी सुनील यादव (वय २५ रा. उरळीकांचन ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादिने दुपारी साडेबाराच्या सुमारास उरळी येथील एक्सिस बॅंकेतून दोन लाखांची रक्कम काढली होती. त्यांनी ही रक्कम गाडीच्या डिकी मध्ये ठेऊन गाडी खासगी हॉस्पिटल समोर लावली. त्यानंतर ते दाढी करण्यासाठी केशकर्तनालयात गेले. दाढी झाल्यानंतर गाडीपाशी आले असता गाडीची डिकी उघडी होती व त्यामधील रक्कम लंपास झाली होती.
त्यानंतर फिर्यादिने अज्याबजुला नागरिकांना विचारपूस केली. मात्र कोणीच काही पाहिले नसल्याचे उत्तर मिळत होते. रक्कम चोरी गेली असल्याचे लक्षात येताच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.