
लोणावळा : प्रतिनिधी
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. दोन दिवसापूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला होता. अशातच पुन्हा त्यांनी ” महाविकास आघाडीचे सरकार उदासीन आहे” असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांच्या हस्ते लोणावळ्यात सुकन्या योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. एसटी कामगारांचे प्रश्न असो, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न असेल. राज्य सरकार सगळ्याच बाबतीत उदासीन आहे. सध्या काय चालले आहे हेदेखील राज्य सरकारला माहिती नाही, अशी टीका अमृता फडणीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेणे गरजेचे होते. पण तसे काही घडले नाही. जर योग्य बैठका घेऊन विद्यार्थ्यांबाबत निर्णय झाला असता तर; आजची परिस्थिती उद्भवली नसती. विद्यार्थ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अन्यथा आज विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.