
अमरावती : प्रतिनिधी
मुलगी आणि वडील हे नातं अतिशय भावनिक असतं. या पवित्र नात्यात अनेकांनी आपल्या मुलीसाठी मोठं योगदान दिल्याच्या घटना आपण पाहतो. मात्र अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात राक्षसी प्रवृत्तीच्या बापाने आपल्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास विहिरीत फेकून जीवे मारण्याची धमकी त्या बापाकडून मुलीला देण्यात आली होती. संबंधित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर या नराधम बापाला गजाआड करण्यात आले आहे.
गुरुवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलीची आई मजुरीसाठी गेलेली होती. तिने आपल्या मुलीला पतीकडे सांभाळण्यासाठी सोडले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून जन्मदात्या बापानेच त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता हा प्रकार कोणाला सांगितल्यास विहिरीत फेकून देईल, अशी धमकी त्या मुलीला दिली. बापाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे आणि जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीमुळे चिमुकली मुलगी घाबरून गेली.
कामावरून घरी परतल्यानंतर आईला ती मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. आईने मुलीला विचारणा केली असता, बापाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले असल्याचे तिने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने शनिवारी रात्री उशिरा नांदगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.