
पुणे : प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव, त्याचे वडील आणि आई यांच्याविरुद्ध पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीची तक्रार स्नेहा विश्वासराव यांनी दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लवकरच अनिकेत विश्वासराव आणि कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
अलंकार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहाला पती अनिकेतने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. अनेकवेळा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.
अनिकेतशिवाय त्याचे वडील चंद्रकांत विश्वासराव आणि आई अदिती विश्वासराव यांचीही नावे आहेत. अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. स्नेहाने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. दोघेही वेगळे राहत होते. अनिकेत विश्वासराव हे मराठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्याच्यावर पत्नीनेच गंभीर आरोप केल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.