मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्वच नागरिकांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.
मुंबई येथे महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
सोमवारी दि. ११ ऑक्टोबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे सुतोवाच नवाब मलिक यांनी यावेळी केले. आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वत:हून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून हा बंद सुरु होईल, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.
भाजप हा पक्ष शेतकऱ्यांचा नाही तर शेतमालावर डल्ला मारणाऱ्यांचा पक्ष होता. आता तर भाजप शेतकऱ्यांना चिरडून मारणारा देखील पक्ष बनला आहे. या जुलमी सरकारला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त १२ कोटी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा दयावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.