बारामती : प्रतिनिधी
गेली तीन चार दिवसांच्या सततच्या अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील जोर गावातील घरांचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे सुमारे एकशे चाळीस घरांची पडझड झाली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तेथील घरांची व रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मंडळ सातारा झोनच्या अंतर्गत बारामती क्षेत्रातील ४० ते ५० सेवादलांची तुकडी खाकी वर्दीमध्ये सेवा करीत आहेत. या तुकडीने पूर्ण गावातील बाधित नागरिकांच्या घरांची साफसफाई करत आपले सेवाकार्य सुरू ठेवले आहे.
संत निरंकारी मंडळ गेली ९० वर्षाहून अधिक काळ मानवतेच्या कार्यात समरस राहून सर्वव्यापी निराकार परमेश्वराची ओळख समस्त मानवमात्राला देऊन खरा भक्तिमार्ग दाखवीत आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान देऊन रक्तदान, नेत्रदान, नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत इ.उपक्रम संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहे. संत निरंकारी मंडळाचे खाकी, निळी वर्दीमधील स्वयंसेवक विविध सेवाकार्यात समर्पित भावाने गुरुकार्याला प्राधान्य देऊन सेवा करतात.
वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची माहिती प्राप्त होताच सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी बारामतीसह क्षेत्रातील चाळीस ते पन्नास सेवादलाना एकत्र करून या परिसरातील बाधित रस्ते, गल्ली, घरे चिखलमुक्त केले. या सोबतच निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अन्नधान्य, किराणा किट, भांडी, ताडपत्री, तसेच प्राप्त जीवनावश्यक साहित्याचे वाटपही येथील कुटुंबाना केले.
नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या जोर गावात सर्वप्रथम संत निरंकारी मंडळाने तात्काळ मदत कार्य सुरू केल्याने गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशा संकटप्रसंगी साक्षात देवदूतच आमच्या मदतीला आल्याचे सांगून जोर गावचे सरपंच हनुमंत जाधव यांनी मंडळाचे आभार मानले.