
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली. या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली. तर त्यांच्या शेजारच्या सीटवर अजित पवार बसले होते. त्यांनी केलेल्या एकत्रित दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई महापालिका निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित लढणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार हे पहाटेच्या दौऱ्यासाठी ओळखले जातात मात्र आजचा त्यांचा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. आज त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. त्याचबरोबर दादर, माहीम, वरळी येथील विकासकामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी मतदारसंघातील विकासकामांचे आणि सौंदर्यीकरणाचे कौतुक केले.
याचवेळी अजित पवार यांनी दुरुस्तीच्या कामांचीही माहिती घेतली. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचे अजित पवार यांनी कौतुकही केले. अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या भल्या सकाळी झालेल्या दौऱ्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढणार का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.