मावळ : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि संबंधितावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अर्धा तास रास्ता रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अजित पवार यांच्याशी संबंधितांवर झालेल्या कारवाईमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. तसेच केंद्र सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यामुळे नाक्याजवळ दोन्ही दिशेने गाड्यांच्या भल्यामोठ्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र काही कालावधीनंतर कार्यकर्त्यांनी रस्ता मोकळा केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या नातेवाईक संबंधितावर आयकर विभागाकडून छापेमारी चालूच आहे. आज देखील छापेमारी सुरूच होती. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.