पुणे : प्रतिनिधी
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यात सक्रिय नाहीत अशी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. यावर स्वतः अजितदादांनी भाष्य केलं आहे. सध्या कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना खुश कसे करायचे हे मला चांगलेच माहिती आहे असं सांगत सध्या अर्थसंकल्पात व्यस्त असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, काही गोष्टी दाखवाव्या लागत नाहीत. निवडणुकीसंदर्भातील गोष्टी या उघडपणे माध्यमांशी बोलून करायच्या नसतात. जर कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना खुश कसे करायचे हे मला चांगलेच माहिती आहे.
माझे प्रथम प्राधान्य राज्याच्या अर्थसंकल्पाला आहे. त्यामध्ये मी सध्या व्यस्त आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. मी राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला विधानसभेत सादर करणार आहे. २८ फेब्रुवारी पासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री राज्यांसाठी काय अर्थसंकल्प मांडतील. यावर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पाचं नियोजन केलं जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.