Site icon Aapli Baramati News

अजितदादांच्या मोबाईल नंबरचा वापर करत बांधकाम व्यावसायिकाला केलं ब्लॅकमेल; सहाजणांना ठोकल्या बेड्या..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून पुण्यातील एका प्रसिद्ध व्यवसाय बांधकाम व्यवसायिकाकडून वीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाजणांना अटक करण्यात आली आहे. 

नवनाथ भाऊसाहेब चोरमुले (वय.२८ रा. हवेली), सौरभ नारायण काकडे( वय २० रा.हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८), किरण रामभाऊ काकडे (वय २५), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९ रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आकाश शरद  निकाळजे (वय३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर बांधकाम व्यवसायिकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता. आरोपीने गुगल प्ले स्टोरवरून ‘फेक कॉल’ ॲप डाउनलोड केले होते. त्यावर अजित पवार यांच्या मोबाईलचा नंबर वापरून संबंधित व्यावसायिकाला फोन केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय, असे सांगून वाडेबोल्हाई  शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले आणि इतर नऊ जणांच्या  मालकीच्या जमिनीचा वाद मिटवण्यात सांगितले. वाद मिटला गेला नाही तर व्यवसायिकाचा प्रकल्पात अडथळा आणून गावात येऊ देणार  नाही, अशी धमकी दिली. 

या टोळक्याने संबंधित व्यवसायिकाकडून २० लाखांची मागणी करून २ लाख रुपये घेतले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावत सहाजणांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अजय जाधव,सुनिल कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर, इम्रान शेख, महेश बामगुडे, महिला पोलीस अंमलदार मीना पिंजण, रुखसाना खान यांनी केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version