मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. १२ आमदारांची रखडलेली नियुक्ती देऊन राज्यपालांनी राज्याला गोड भेट द्यावी, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत राहिलेत. लॉकडाऊन काळात मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पत्र असो की मंतीमंडळाने दिलेल्या १२ आमदारांचा प्रस्ताव असो. राज्यपालांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडी सरकारने नेहमीच नापसंती व्यक्त केली आहे. आजही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना १२ आमदारांच्या नियुक्तीवरून घेरले आहे.
संजय राऊत यांनी ट्विटरवरुन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!
संजय राऊत यांनी राज्यपालांना वाढदिवसादिवशीही लक्ष्य केले आहे. राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव देऊन त्याला अद्याप मंजूरी दिलेली नाही. या विषयावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अनोख्या शुभेच्छांना राज्यपाल कसा प्रतिसाद देतात याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.