मुंबई : प्रतिनिधी
जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी ‘त्या’ वक्तव्यावरून माफी मागितली आहे.
जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात अनेक नेतेमंडळी हजर होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमामालिनी यांच्या गालांप्रमाणे गुळगुळीत होतील असे म्हटले होते. त्यावरून भाजप नेत्यांकडून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका झाली होती. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले होते. मात्र या सर्व प्रकारानंतर गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे.
“जर माझ्या वक्तव्यानं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. हेमा मालिनी यांनीदेखील त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आपल्याला काही फरक पडत नसल्याचं म्हटले आहे. मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील,’ असं म्हणत हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाला प्रतिउत्तर दिले.
लालूप्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे त्यांनाही वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही, अशा स्पष्ट शब्दात हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.