Site icon Aapli Baramati News

साताऱ्यात राष्ट्रवादीने केला ‘करेक्ट कार्यक्रम’; जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील, उपाध्यक्षपदी अनिल देसाई; शिवेंद्रराजेंना धक्का

ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील आणि उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव चर्चेत असतानाच नितीन पाटील बिनविरोध निवड झाली. त्यामुळे शिवेंद्रराजेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा बँकेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी संचालक मंडळाची बैठक पार पडली. शरद पवार यांनी दिलेल्या  निर्णयानुसार बँकेच्या अध्यक्षपदासाठी नितीन पाटील यांचे, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार या दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी  शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत अध्यक्षपदाची इच्छा बोलून दाखवली होती. तसेच शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन उत्तम पद्धतीने बँकेचे अध्यक्षपद सांभाळले असल्यामुळे पुन्हा संधी मिळावी, अशी विनंती शरद पवार यांना केली होती. त्यावर शरद पवार यांनी ६ डिसेंबरला निर्णय कळवला जाईल असे स्पष्ट केले होते.

आज निवडीच्या वेळी थेट नितीन पाटील यांचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादीने करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा झडू लागली आहे. दुसरीकडे अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना हा धक्का मानला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version