सातारा : प्रतिनिधी
एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी साताऱ्यात एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुधाकर शंकर कुमावत (वय-४१ रा. वाई, जि. सातारा) असे या उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार अडकलेला होता. तसेच त्यांचा वीस वर्षांचा लाभ,सातवा वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपये एवढी रक्कम अडकली होती. त्यासाठी त्यांनी उपकोषागार सुधाकर कुमावत यांची भेट घेऊन थकीत रक्कम काढण्याची विनंती केली. मात्र कुमावत यांनी या कामासाठी १० हजार रुपयांची लंच मागितली.
याबाबत संबंधित तक्रारदारने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस अधीक्षक अशोक शिर्के यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यातील तक्रारदाराने संबंधित लाचखोर अधिकाऱ्याशी तडजोड करत २ हजार रुपये देण्याचे कबूल केले.
सोमवारी एसबीच्या पथकाने सापळा रचत वाई येथे एक हजार रुपये घेताना सुधाकर कुमावत याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा सुधाकर कुमावत याला अटक करण्यात आली.