Site icon Aapli Baramati News

सह्याद्री पर्वताची उंची टेकड्यांना काय समजणार..? शरद पवार यांच्यावरील टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील आणि शरद पवार कधी पंतप्रधान होतील, असा प्रश्न केला होता. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, मी त्यांना सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या इतकी व्यक्तिमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री आणि सह्याद्रीची उंच कधीच समजणार नाही. 

पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान होण्यापूर्वी उंची मोठी होती असेही त्यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला. सेनेच्या डिपॉझिटची काळजी फडणवीसांनी करू नये. पक्षांतर्गत लढाई लढावी. फडणवीस गोव्यात गेले आणि भाजप पक्ष फुटला. दोन नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला. फडणविसांनी आधी ते पहावे अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version