मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्यांत शिवसेना आणि भाजपा आमने-सामने झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
ज्या १२ आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातला. लोकशाहीला धोका होता म्हणून १२ आमदारांचे निलंबन करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निलंबन मागे घेऊन त्या आमदारांवर सहानुभूती दाखवली आहे. मग सहानुभूती आमच्या आमदारांना का नाही ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय सूडापोटी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या फाईल दाबून ठेवल्या आहेत. त्यांची नियुक्ती दोन वर्षांपासून रखडवलेली आहे. हा त्यांचा हक्क नाही का? लोकशाहीला असलेला हा सगळ्यात मोठा धोका असून त्यांच्यावर न्यायालयात काहीच निर्णय घेत नाही. ही खुप आश्चर्याची गोष्ट आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.