पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकार महागाईच्या दरीत ढकलत आहे. सर्वसामान्य जनतेविषयी केंद्र शासनाला कोणतीही आस्था राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत आहे. राज्याने केंद्राला कोळशाचे ३००० कोटी रुपये दिले नाही; म्हणून त्यांनी राज्याला कोळसा देणं बंद केले. मात्र राज्याचे केंद्र सरकारकडे जीएसटीचे ३५ हजार कोटी रुपये थकित आहेत. तरीही केंद्र सरकार राज्य सरकारवरच आरोप करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
आगामी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीय तपास यंत्रणेचा केंद्र शासन गैरवापर करत आहे. जर सीबीआयला राज्यांमध्ये कारवाई करायची असेल तर, राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. परंतु महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. भाजप सत्तेचा गैरवापर करत आयकर विभाग, केंद्रिय अन्वेषण विभाग, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात माझा सहभाग होता. आघाडी स्थापनेच्या वेळी आमदारांच्या बैठकीत सरकारचे नेतृत्व कोणी करावे यासाठी तीन नावाची चर्चा होती. यासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते. मी स्वत: ठाकरे यांचा हात धरून ते या पदावर काम करतील असे सांगितले. माझे आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध चांगले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाकडे मुख्यमंत्रीपद द्यावे हा माझा आग्रह होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.