Site icon Aapli Baramati News

संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाहीत: नवाब मलिक यांचे फडणवीसांना आव्हान

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे, असा गंभीर आरोप भाजपावर केला होता. या आरोपावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केला असता तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते असे म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. अर्धेच काय, संपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका. आम्ही कुणालाच घाबरत नाही  असे आव्हानच नवाब मलिक यांनी दिले आहे.

ज्या राज्यात विरोधकांचे सरकार आहे, त्या राज्यात केंद्र शासन अधिकाऱ्यांवर दबाव टाकून  केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या केसेस बनवून त्या राज्यांना बदनाम करत आहे. विशेषतः महाराष्ट्र  आणि पश्चिम बंगालच्या सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करत तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता. मात्र आम्ही कुणालाही घाबरत नाहीत, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप लावले जातात त्यावेळी त्यांनी सावधगिरीने हे आरोप करायला हवेत असे म्हणत ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला  लगावला. काही दिवसातच आम्ही असे  बरेचसे उंदीर बाहेर  काढणार आहोत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात क्रांतिकारक लाल-बाल-पाल यांचा उल्लेख केला होता. यावर बोलताना मलिक म्हणाले, ब्रिटिशांच्या जुलमी अत्याचाराविरोधात लाल-बाल-पाल यांनी आवाज उठवत क्रांती केली होती. तीच क्रांती केंद्रातील सरकारविरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांमधून उभी राहणार आहे. जुलमी भाजपाचे सरकार उलथून टाकायला हे तिन्ही राज्य कारणीभूत ठरतील असेही भाकीत त्यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version