कोल्हापूर : प्रतिनिधी
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांनाच फक्त शिवसेना काय आहे कळले, असे विधान केले आहे. या विधानावर कोण मोठे आहे आणि कोण छोटे आहे याचे मूल्यमापन मी करणार नाही. परंतु संजय राऊत यांनी आग लावण्याचे काम कमी करून पक्षाकडे लक्ष द्यायला हवे अशी खोचक टीका करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी संजय राऊत राऊत यांनी त्यांचे नाव घेतले आहे. मी भाजपाचा असल्यामुळे कोण मोठा आहे, कोण छोटा आहे याचे मूल्यमापन करणार नाही. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपा वाढवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे.परंतु संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत. पक्षाला गळती लागली आहे. त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तुमचा पक्ष तळागाळापर्यंत संपत चालला आहे. दुसऱ्यावर टीका करून पक्ष वाढणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेपर फुटीबद्दल बोलताना राणे म्हणले , पेपरफुटी म्हणजे पैसे देऊन केलेला भ्रष्टाचार आहे. सध्या सरकार अस्तिवात नाही. जर सरकारचा प्रमुखच अस्तित्वात नसेल तर, या यंत्रणांवर कोणाचा अंकुश राहील. मुळात सरकार अस्तिवात आहे का नाही, हाच मोठा प्रश्न आहे. विकास ठप्प झाला आहे. शेतकऱ्यांचे, मजुरांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे तिथेच आहेत. या दोन वर्षात महाराष्ट्र किमान दहा वर्ष मागे गेल्याची टीकाही त्यांनी केली.