
मुंबई : प्रतिनिधी
गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाच्या उमेदवारीवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संजय राऊत सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना नटसम्राटसारखी भूमिका द्यायला हवी, अशी घाणाघाती टीका केली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत परिस्थितीनुसार उत्तर दिले जाईल. मात्र संजय राऊत यांना एखाद्या नटसम्राटसारखी भूमिका द्यायला हवी. ते सकाळी वेगळी आणि संध्याकाळी वेगळी अशी उत्तम प्रकारे भूमिका निभावू शकतात.
मनोहर पर्रीकर आजारी असताना त्यांनी गोव्याचे बजेट विधानसभेत सादर केले होते. यावेळी संजय राऊतांनी गोव्यातील सरकार आजारी आहे आणि ते चालवणे अयोग्य आहे, अशी टीका केली होती. तेव्हा तुमची काय भूमिका होती हे सर्वांनी पाहिले आहे, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेनेला सोबत घेतल्यास गोव्यात मतदारसंघावर परिणाम होईल हे काँग्रेसला माहित आहे. त्यामुळेच काँग्रेसने तुम्हाला आम्ही सोबत घेऊ शकत नाही थेट सांगितले आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत गेली, तरी काहीच फरक पडणार नाही. संजय राऊत यांनी राजकीय भूमिका बदलणे आणि नटसम्राटप्रमाणे वागणे थांबवावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.