
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मंगळवारी बहुप्रतिक्षित पत्रकार परिषदेत पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला आहे. या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवनात संजय राऊत यांचा एकपात्री प्रयोग झाला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
आरोप झाले तर त्यातून स्वतःला निर्दोष मुक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते बाजूलाच राहिले मात्र राऊत आरोपचं करत होते. असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता. राजकिय सभ्यतेत बसणारी राऊत यांची भाषा नव्हती. त्यासाठीच शिवसेनेने त्यांच्यापासून एक ठराविक सुरक्षित अंतर राखले, असा टोला त्यांनी लगावला.
गेल्या दोन-तीन दिवसापासून ते वारंवार मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा करत होते. या जगात आजपर्यंत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही का..? यांचीच पहिल्यांदा पत्रकार परिषद होत आहे, असे ते वागत होते. या सगळ्या गोष्टीतून ‘खोदा पहाड निकला चूहा’ असे सिद्ध झाले आहे. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणे ही त्यांची संस्कृती असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण पत्रकार परिषदेत होते. राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची तर चांगली करमणूक झाली असेल. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.