अहमदनगर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष हा एसटी कामगारांच्या पाठीशी असून तुम्हाला कितीही नोटीसा आल्या, निलंबन झाले तरी तुमचं लढा सुरूच ठेवा असे सांगतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसटीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी दिलेल्या आश्वासनांची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे, असा दावा केला आहे.
राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानकाजवळ चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली. माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे हेही यावेळी उपस्थित होते.
पंधरा दिवसांमध्ये विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात दिले होते. त्या भाषणाची क्लीप माझ्याकडे आहे. आता त्यावेळी दिलेल्या आश्वासनचे काय असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. मी एका एसटी वाहकाचा मुलगा आहे. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांशी भावनिक नाते आहे. या भावनेतून मी तुमच्या सोबत आहे. हे आंदोलन संघटनेचे किंवा पक्षाचे राहिलेले नाही. भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होऊ देणार नाहीत. आता ही लढाई करो या मरो या पद्धतीने लढायची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. या आंदोलनात आम्ही आमचे झेंडे नाचवत नाही असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.