जागतिक पर्यावरणदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
बारामती : प्रतिनिधी
“मनुष्य आणि समस्त प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नधान्याची आवश्यकता असते. ही गरज केवळ निसर्गाच्या, पर्यावरणाच्या संरक्षण, संवर्धनातूनच पूर्ण होऊ शकते. वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, वाढते औद्योगिकीकरण, त्यासाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, हवा व जलस्रोतांचे प्रदूषण ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी निसर्गपूरक जीवनमानाचा अवलंब केला पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
जंगलांचे क्षेत्र वाढवलं पाहिजे. शहरांमध्येही आंबा, वड, पिंपळ अशी भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजेत. नदी, ओढे, विहिरी, झरे आदी जलस्त्रोत, जलप्रवाह प्रदूषणमुक्त ठेवले पाहिजेत. प्रदूषणमुक्त हवा आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व आपण जाणले आहे. हवेतील ऑक्सिजनचे नैसर्गिक प्रमाण कायम ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आता करावे लागतील.
कमी अंतराच्या प्रवासासाठी सायकलचा वापर चांगला पर्याय ठरू शकतो. अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवूनही पर्यावरणाच्या संरक्षणाला मदत मिळू शकते. कोरोना संकटाने आपल्याला निसर्ग संवर्धनाचे, पर्यावरण स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. येणाऱ्या काळातही वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात पर्यावरण स्वच्छता राखत आपण सर्वजण निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करूया. आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.