मुंबई : प्रतिनिधी
लतादीदींच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत लतादीदींचे शिवाजी पार्कवर स्मारक बांधण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करू नये. लतादीदींचे स्मारक केंद्राने बांधावे, असे म्हटले आहे.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, लतादीदी या महान आत्मा आहेत. त्यांचे महाराष्ट्रासोबत नाते आहे. त्यांनी आपल्या देशात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. जरी त्या शरीर रूपाने गेल्या असल्या; तरी त्यांचा आत्मा आपल्याकडेच आहे. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्या राजकीय नेते नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. लतादीदींचे स्मारक बांधणे सोपी गोष्ट नाही. याबाबत केंद्र सरकारने विचार करायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये लतादीदींचे स्मृतीस्थळ शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदी अनंतात विलीन झाल्या. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. जनतेच्या मागणीचा विचार करून हे स्मारक लवकर निर्माण करावे , अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.