मुंबई : प्रतिनिधी
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजत निधन झाले. यानंतर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली आहे. लतादीदींच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत “आपल्या सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांचे निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे “, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.
“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे.
स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विश्वरत्न लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचे नसणे कायम सलत राहील. त्यांचे गाणे आपल्याला सदैव त्यांची आठवण करून देत राहतील.या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत,अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील. परंतु लतादीदी आपल्यात नसतील.ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही. अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या.