पुणे : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या या कामाची दखल घेत प्रशासकीय सेवेत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार’ त्यांना जाहीर झाला आहे. ‘अरुण बोंगिरवार’ फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दि. ६ जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘पुणे’ शहर हे कोरोनाचे मुख्य ‘हॉटस्पॉट’ ठरलेले शहर होते. मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. अशातच आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सोपवली होती. गरीब रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटरची उभारणी, रुग्णांसाठी बेड त्यांनी उपलब्ध करून दिले होते. त्याचबरोबर मृत्युदर वाढल्यानंतर नवीन हॉस्पिटलची कमीत कमी वेळात रुग्णांसाठी उपलब्धता करून दिली होती.
खाजगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेऊन तेथील रुग्णावर उपचार करण्यास व्यवस्थापनास त्यांनी भाग पाडले होते. त्यामुळे पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला होता. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा धोका रुग्णांना होऊ नये म्हणून ऑक्सिजन बचतीचा प्रयोग केला, त्यात त्यांना यश आले. खासगी हॉस्पिटलमधील ९ रुग्णांना ऑक्सिजन संपल्याने त्यांची मृत्यूशी झुंज चालू होती, त्या रुग्णांना केवळ दीड तासातच महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केले होते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनादेखील या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.