जालना : प्रतिनिधी
राज्य सरकारचे कौतुक पाहून काही जणांना पोटदुखी आणि मळमळ होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
शनिवारी जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते.सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यावर त्यांनी दबंग चित्रपटातील एक डायलॉग म्हणून त्याला प्रतिसाद दिला.
‘थप्पड से डर नही लगता साहब प्यार से लगता है.’ हे कौतुक वेगळं आहे. आम्ही राजकारणी माणसं, थपडा देण्यात आणि खाण्यात आमचं आयुष्य चाललं आहे. कोणी माझं कौतुक केले की मला धडधड होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने चांगलं काम केले. मात्र काही जण आरोप करतात. आरोप करणाऱ्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. त्यांनी स्वतः आरोग्य केंद्रात जाऊन सरकारी दरात उपचार करून घ्यावा. नाहीतर आम्ही फुकट उपचार करून देऊ. इलाज करणे हे सरकारचे काम आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे, धर्मदाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मादाय वकील संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.