पुणे : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी कोणत्याही प्रकारची कामे केलेली नाहीत. एकीकडे दारूवरील कर कमी केला आहे. मात्र सामान्य जनतेसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केली नाही. राज्यात सरकारही नाही आणि धोरणेही नाहीत अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला लक्ष्य केले. ज्या राज्यात सरकार असते. त्या राज्यांमध्ये सरकारची धोरणे असतात. मात्र महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळे जनतेसाठी धोरणेही नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मोठे उद्योजक मुंबईमध्ये येतात, चर्चा होते. आमच्या सरकारच्या काळामध्ये मुंबईतील एकही उद्योग बाहेर गेलेला नाही. आमच्या सरकारच्या काळामध्ये कोणी आमच्याकडे चर्चा करायला आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आमच्यावर टीका करत असत. परंतु हे सरकार असेच अपयशी होत राहिले, तर मुंबईमधील उद्योग नक्कीच बाहेर जातील, असेही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर राज्य सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईवरही भाष्य केले. फडणवीस म्हणाले, सध्या सरकारमध्ये संभ्रम आहे. कोणावर कारवाई करावी आणि कोणावर कारवाई करू नये, याबाबत सरकार संभ्रमात पडले आहे. सरकारने ज्या प्रकारे परमवीर सिंग यांच्यावर कारवाई केली आहे. त्याचप्रकारे परमवीर सिंग यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावरही कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी. राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी नेत्यांवर बोलणाऱ्यांवर कारवाई करत आहात. मात्र भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचत आहात हे वागणे बरोबर नाही असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.