मुंबई : प्रतिनिधी
बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यावरून राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चेदेखील निघाले होते. तरीदेखील यावर उपाय निघाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर धडकणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे म्हणजे प्रस्थापित मराठ्यांचे सरकार आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्यात या सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार इच्छुक नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
शिवनेरी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार असून याबाबत अनेक संघटनासोबत चर्चादेखील झाली आहे. येत्या आठ दिवसात याबाबत राज्यव्यापी बैठक होणार आहे. मोर्चाचे सर्व नियोजन झाले असून, लवकरच या मोर्चाची तारीख जाहीर करणार असल्याचे केरे यांनी सांगितले.