Site icon Aapli Baramati News

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदार गायब आहे : उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीशांसमोर वक्तव्य

ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदार गायब आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर केली आहे. 

सरन्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी परमवीर सिंग यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. 

काही महिन्यांपूर्वी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांच्याकडे तक्रार केली होती. या पत्रामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी चालू आहे.

परमवीर सिंग यांच्यावरही अनेक आरोप आणि तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यासुद्धा तक्रारींची चौकशी चालू आहे. मात्र परमवीर सिंग तपास यंत्रणा तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगासमोर अद्याप हजर झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून परमवीर सिंग यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. सध्या परमवीर सिंग कोठे आहेत कोणालाच माहिती नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांसमोर टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अगोदर झालेल्या एका भाषणात एक आरोपी 1958 पासून गायब झाल्याचा उल्लेख झाला होता. त्याच उल्लेखाची नोंद करत आमच्याही राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक तक्रारदारच गायब झाला. त्याने तक्रार केली, पळून गेला, कोठे पळून गेला हे काहीच माहिती नाही. त्याने तक्रार केली त्यानुसार तपास चालू आहे. धाडीचे सत्र इकडे तिकडे चालू आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या अतिरेकाबाबत नाराजी व्यक्त केली.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version