Site icon Aapli Baramati News

राज्यपालांचं वय झाल्यामुळे ‘त्या’ पत्राकडे लक्ष गेलं नसेल : १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा टोला

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी   

१२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल पुण्यात केलेल्या विधानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मी राज्यपालांचं विधान ऐकलं; ते म्हणतात सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. परंतु प्रत्यक्षात आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने पत्र दिले आहे. मात्र वाढत्या वयामुळे ते राज्यपालांच्या लक्षात आले नसेल अशा शब्दांत शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष काही थांबत नाही. अशातच काल पुण्यात कॉँग्रेस नेत्यांनी १२ आमदारांची नियुक्ती करण्याची विनंती राज्यपालांना केली. त्यावर राज्यपालांनी ‘उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता? असा सवाल करत या विषयावर राज्य सरकारने पाटपुरावा केला पाहिजे’ अशी भूमिका मांडली.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबाबत विचारले असताना त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला आहे. राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय. मात्र, १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र गेलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळाने भेटही घेतल्याचे सांगून शरद पवार यांनी ‘शहाण्याला शब्दांचा मार’ या म्हणीची आठवण करून देत राज्यपालांवर शरसंधान साधले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version