Site icon Aapli Baramati News

येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार : दिलीप वळसे पाटील

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेले मुख्यालय येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला, त्यावेळी श्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक यु. टी. पवार उपस्थित होते.

गृहमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले, मुंबई मध्ये शिकागोच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधण्यात येईल. असे सांगून ते पुढे म्हणाले, आटपाडी येथे असलेली पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे, त्याचप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी बंद्याना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे, जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आन करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले.

यावेळी गृहमंत्री श्री वळसे पाटील यांच्या हस्ते 2019-20 सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. श्री वळसे पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version