पुणे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे परीक्षा घेण्यात येते. महाविद्यालये बंद असल्यामूळे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र येत्या १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन परीक्षा होणार असल्याचं विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत केवळ सहा लाख अर्ज भरले आहेत. तर २ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने २० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर परीक्षा संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. २०१९ च्या पॅटर्ननुसार शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात दिली आहे.
गतवर्षी ऑनलाईन परीक्षांचे काम विद्यापीठाच्या एजन्सीकडे होते. यंदाच्या होणाऱ्या परीक्षांचे काम कोणते एजन्सीकडे असणार आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता होती. त्यापूर्वी विद्यापीठाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. बहुतेक गेल्यावर्षीच्या एजन्सीला यावर्षी ऑनलाईन परीक्षांचे काम मिळण्याची शक्यता आहे.