मुंबई : प्रतिनिधी
काल मुंबई आणि आसपासच्या भागात जिओची सेवा आठ तास बंद होती. या प्रकरणी ग्राहकांनी सोशल मीडियावर तक्रार केली होती. प्रकरणाची दखल जिओने घेतली असून मुंबई आणि आसपासच्या भागात दोन दिवस मोफत ‘अनलिमिटेड प्लॅन’ ची घोषणा त्यांनी केली आहे.
जिओ कंपनीला ही समस्या दुपारी समजली. कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात वापरकर्त्यांना येणाऱ्या समस्यांची कबुली दिली आणि ग्राहकांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीकडून अतिरिक्त दोन दिवसांचा अनलिमिटेड प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. ‘आमच्या टीमने या नेटवर्क समस्येचे काही तासातच निराकरण केले. तुमच्यासाठी हा अनुभव चांगला नव्हता. त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहे’, असे जिओ कंपनी माफी मागताना म्हटले आहे.
टप्पाटप्प्यात जिओ कंपनीची सेवा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान ग्राहकांना त्यांचे फोन ‘रिस्टार्ट’ करण्यास सांगितले. ग्राहकांना एकमेकांशी बोलण्यासाठी व्हाट्सअप कॉलचा आधार घ्यावा लागला. त्याचबरोबर वाय-फाय कॉलिंगचीही त्यांना मदत घ्यावी लागली, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.