राळेगणसिद्धी : प्रतिनिधी
वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे १४ फेब्रुवारीपासून उपोषण करणार होते. मात्र अण्णांनी उपोषण करू नये, असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. वयाचा विचार करता त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांना केली होती. त्यांनाही हा ठराव मान्य झाल्याने त्यांनी उपोषण करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देखील पाठवले होते. सरकारकडून त्यांना कोणता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी आपले ५० टक्के समाधान झाल्याचे सांगितले होते. याच दरम्यान, ग्रामपंचायतीने अण्णांनी वयाचा विचार करुन उपोषण करु नये अशी विनंती केली होती. तसा ठरावही करण्यात आला होता. त्यानंतर आता अण्णा हजारे यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.