कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे ११ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ( सोमवार ) त्यांचा रक्तदाब कमी झाला होता आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सांगली जिल्ह्यात एका सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या एन. डी. पाटील यांनी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात दोन वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले आहे. १९४८ मध्ये त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काही दिवस गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस पद सांभाळले होते. ते १९६०ते १९८२ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य होते. १९७८ ते १९८० असे दोन वर्षे त्यांनी राज्याचे सहकार मंत्री पद सांभाळले आहे.
एन. डी. पाटील यांनी १९८५ ते १९९० असे पाच वर्षे कोल्हापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. रयत शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी बरेच दिवस काम पाहिलेले आहे. २००१ मध्ये परभणी येथे भरलेल्या विचारवेध साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याबद्दल कोल्हापूर विद्यापीठाने त्यांना डि.लिट ही मानाची पदवी प्रदान केली होती. शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.