अहमदनगर : प्रतिनिधी
राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिर्डीमध्येही धुके आणि पाऊस एकत्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिर्डीमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे. पाऊस किंवा गारठ्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यातील एक मृतदेह हा शिर्डीमधील नगर-मनमाड रोडच्या कडेला आढळला आहे, तर दुसरा मृतदेह हा कनकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ आढळला आहे. दरम्यान या मृतदेहांपैकी एका मृतदेहाजवळ त्याची ओळख पटणारी कागदपत्रे आढळून आली आहेत. या मृत व्यक्तीचे नाव एकनाथ हाटे आहे. हा व्यक्ती मूळचा कल्याणचा राहणारा होता. मात्र, दुसऱ्या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही.
संबंधित मृत व्यक्तींची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मृतदेहाजवळ कागदपत्रे आढळून आली आहेत. यानुसार हा मृत व्यक्ती शिर्डीत उपचारासाठी आला असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधलेला आहे.
तसेच दुसरी व्यक्ती ही शिर्डीत भिक्षेकरू म्हणून राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.